रत्नागिरी, आंजणारी (ता. लांजा) येथील काजळी नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या आंजणारी शिंदेवाडीतील दोन सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला. प्रमोद नारायण शिंदे (२५) आणि मनीष नारायण शिंदे (२२) अशी या दोघा भावांची नावे आहेत.
या दोघा भावांची बहीण कल्याणी आणि मामा पांडुरंग शिंदे पाण्यातून वेळीच बाहेर आल्यामुळे बचावले. पोलीस पाटील श्रद्धा सरपोतदार आणि ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांबळे यांची मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत झाली. प्रमोद आणि मनीष यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आता दोन भाऊ गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
काजळी नदीवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने काजळी नदीत या काळात मुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मुळे काढण्यासाठी दुपारी प्रमोद आणि मनिष, बहीण कल्याणी आणि मामा पांडुरंग शिंदे यांनी बेत आखला. नांदिवलीच्या स्मशानभूमीत काजळी नदीच्या डोहात मुळे या एक प्रकारच्या माशांचा शोध घेण्यासाठी चौघे पाण्यात उतरले होते. मुळे मिळत होते मात्र प्रमोद आणि मनीष पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात पुढे जात असताना खोल डोहात बुडू लागले. यावेळी दोघेही भाऊ एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न करू लागले, परंतु खोल पाण्यात ते बुडाले. बहीण आणि मामा यांनी अर्धा तास झाला तरी दोघे बाहेर न आल्याने आरडाओरडा केला.
याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांबळे आणि पोलीस पाटील श्रद्धा सरपोतदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या दोघा भावांना बाहेर काढण्यासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वेरळ गावचे वसंत गजबर, गणपत शिखरे, दीपक पाष्टे यांनी बुडालेल्या दोघा भावांना सायंकाळी सहा वाजता पाण्यातून बाहेर काढले. सरपंच प्रवीण शिखरेही घटनास्थळी दाखल झाले.
