मुंबई, महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या आघाडीच्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स सुविधा पुरवठादार कंपनीने देशभरात कम्युनिटी सेंटर्स ऑफ एक्सलन्स (सीसीओई) स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्थापन केलेल्या व ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या लॉजिस्टिक्स स्किल कौन्सिल या संस्थेसह भागिदारीत ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा अभाव कमी करण्यासाठी ही केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या केंद्राद्वारे लाभार्थीना कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच वेयरहाउसिंग, वाहतूक आणि पुरवठा साखळीच्या इतर कामाकाजाशी संबंधित प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले जाईल. ही केंद्रे रोजगारनिर्मितीवरही भर देणार आहेत.
पहिल्या टप्प्यात महिंद्रा लॉजिस्टिक्सने भिवंडी येथे पहिले सीसीओई सुरू केले असून त्यानंतर आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत असे आणखी एक केंद्र गुवाहाटीमध्ये सुरू केले जाणार आहे. दोन्ही केंद्रांच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत एकूण ५०० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये वंचित वर्गातील लाभार्थी, स्त्रिया, दिव्यांग व्यक्ती आणि एलजीबीटीक्यूआयए समाजाचा समावेश असेल.
भिवंडीतील पहिल्या कम्युनिटी सेंटर ऑफ एक्सलन्सविषयी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘कौशल्य यंत्रणेत असलेला अभाव शिक्षण, नाविन्यपूर्ण कौशल्यांचे प्रशिक्षण आणि रोजगारातून भरून काढत समाजाला योगदान देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. लॉजिस्टिक्स स्किल कौन्सिल कुशल कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी तसेच या क्षेत्रात रुपांतर घडवून आणण्यासाठी बांधील आहे. हा उपक्रम लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कुशल कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करेल तसेच ३० टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाजात सहभागी करून घेईल.’
महिंद्रा लॉजिस्टिक्स कम्युनिटी सेंटर ऑफ एक्सलन्स अंशतः कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी काम करणार आहे. त्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम, थिअरी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा वापर केला जाईल. भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्र २२ दशलक्ष लोकांना रोजगार देणारे सर्वात मोठ्या रोजगार क्षेत्रांपैकी एक आहे. उद्योगक्षेत्राशी संबंधित कौशल्ये आणि प्रमाणीकरणामुळे भारतीय लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
