– अल निनोचा प्रभाव संपुष्टात येणार
– मे महिन्याच्या अखेरीस पुढील सुधारीत अंदाज
– महाराष्ट्रासह २५ राज्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित
नवी दिल्ली : यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी वर्तवला. जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी १०६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला असून साधारणत: ८ जूनपर्यंत मान्सून भारतात दाखल होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मान्सूनबाबतची पुढील वाटचाल किंवा माहिती मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केली जाईल, असे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. यामुळे कृषी क्षेत्रासह सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे. हवामानशास्त्र विभागाच्या मते सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानतो. हे पिकांसाठी चांगले लक्षण असते.
आयएमडीने म्हटले आहे की, २०२४ मध्ये १०६ टक्के म्हणजेच ८७ सेमी पाऊस पडू शकतो. चार महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी ८६८.६ मिलीमीटर म्हणजेच ८६.८६ सेंटीमीटर आहे. म्हणजे पावसाळ्यात इतका एकूण पाऊस पडला पाहिजे. याआधी ९ मार्च रोजी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता. याचा अर्थ जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ९६ ते १०४ टक्के पाऊस पडू शकतो.
पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपुष्टात येईल. सध्या अल निनोचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन मे महिन्याच्या अखेरीस पुढील सुधारीत अंदाज जाहीर केला जाईल. सध्या हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला अंदाज हा पहिला दीर्घकालीन अंदाज असून त्यानंतर पुढील मान्सूनसंदर्भातील अंदाजामध्ये यंदाच्या पावसाळ्याबाबत अधिक स्पष्टता मिळण्यास मदत होईल.
२५ राज्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित – केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव.
४ राज्यांमध्ये सामान्य पाऊस अपेक्षित – छत्तीसगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख.
६ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित – ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.
हवामानाच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग सुरुवातीला (जून-जुलै) मंद असेल, परंतु त्याची भरपाई दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) होईल. शास्त्रज्ञांच्या मते, मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांची संख्या कमी होत आहे, तर खूप मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांची संख्या, म्हणजेच कमी कालावधीत खूप मुसळधार पाऊस असलेल्या दिवसांची संख्या वाढत आहे. वारंवार येणारे दुष्काळ आणि पूर हे याचे कारण आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार २०२३ मध्ये ८२० मिमी पाऊस झाला होता. साधारणपणे ८६८.६ मिमी पाऊस पडतो, म्हणजेच गेल्या वर्षी ४८ मिमी कमी पाऊस झाला होता. याआधी सलग चार वर्षे सामान्य किंवा जास्त पाऊस पडत होता. २०२३ मध्ये २५ सप्टेंबरपासून मान्सूनचे प्रस्थान सुरू झाले आणि ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण पंजाब, हरियाणा, दिल्लीसह जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून मान्सून माघारी फिरला होता.
