मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आज, मंगळवारी भाजपप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतल्यापासून त्यांच्या महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती. त्यानुसार मनसेच्या मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात ठआकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताना ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी ठणकावून सांगितले की, चिन्हावर कोणतेही कॉम्प्रमाईज होणार नाही. हे इंजिन चिन्ह कार्यकर्त्यांच्या कष्ठाने कमावलेले असून आमच्या पक्ष त्याच चिन्हावर निवडणूक लढेल. लोकसभा लढणार नसलो तरी विधानसभेच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, मला भूमिका पटल्या नाहीत तर मी त्यांच्यावर टीका करायलाही मागे रहात नाही. देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर खंबीर नेतृत्व असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप, शिवसेना युतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे मी त्यांना सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे मला भेटले होते. त्यांना मी सांगितले की, जागावाटपाच्या भानगडीत मला पाडू नका. मी 1995 पासून कधी जागावाटपाच्या बैठकीत गेलो नाही. मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नको आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्षपद भूषवणार असल्याच्या चर्चांचे खंडन त्यांनी केले. शिंदेच्या शिवसेनेचे अध्यक्ष व्हायचे असते तर यापूर्वीच झालो असतो असे राज यांनी सांगितले. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. महायुतीला पाठिंबा हा स्वार्थप्रेरित नाही. उद्धव ठाकरे सत्तेत असताना ते खिशात राजीनामा असल्याची हुल देत सत्तेचा लाभ घेत राहिले. आपले राजकारण त्यापद्धतीचे नाही असे राज यांनी यावेळी स्पष्ट केले.
