भंडारा, आचारसंहिता काळात तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) कर्तव्यावर असताना दारू पिऊन निवांत झोपणे दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.निवडणूक कालावधीत कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पवनीचे विस्तार अधिकारी व भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक निलंबित यांना निलंबित केले आहे.एल. जे. कुंभरे विस्तार अधिकारी पंचायत समिती पवनी आणि सचिन पढाळ वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा असे निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तपासणी नाका अर्थात चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात निलज येथेही तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निवडणूक निरीक्षक खर्च अधिकारी यांचा पवनी येथे दौरा असता त्यांनी निलज चेकपोस्टला भेट दिली. यावेळी संबंधित कर्मचारी हे दारू पिऊन पोलिस तंबूत झोपले असल्याचे आढळले. लागलीच त्यांची वैद्यकिय तपासणी करीत दोषी आढळल्यावर निवडणूक कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित आहे. या घटनेमुळे शासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.निवडणूक कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
