पुणे
राज्यातील बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघातून अखेर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार, हे आता स्पष्ट झालं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही आजच अधिकृतरित्या घोषणा झाली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने नणंद भावजय आमनेसामने दिसणार असून सार्या महाराष्ट्राचे लक्ष या विशेष लढतीकडे लागले आहे.
उमेदवारीची घोषणा होताच सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच सुप्रिया सुळेंनाही आव्हान दिलं आहे.सुनील तटकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भाग्याचा दिवस आहे. कारण आज महायुतीच्या माध्यमातून मला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. मला ही संधी दिली त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रासपचे महादेव जानकर या सर्वांचेच आभार मानते, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
