अमरावती,. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, कृषी, राजकारण, समाजकारण, न्याय आदी क्षेत्रामध्ये बहुमूल्य कार्य केले असून राष्ट्रविकासामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रोफेसर डॉ. शमा चिनॉय यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्र, विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एककदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात करण्यात आले, त्याप्रसंगी बीजभाषण करतांना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, उद्घाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे श्री दिलीपबाबु इंगोले, उपाध्यक्ष श्री भैय्यासाहेब पुसदेकर पाटील, प्रमुख अतिथी म्हणून व्य.प. सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, व्ही.एम. मेटकर, दिल्ली विद्यापीठ शिवाजी महाविद्यालयाच्या प्रो. डॉ. शमा मित्रा चेनॉय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्राचार्य डॉ. आर.एम. भिसे, डॉ. पंजाबराव देशमुख केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, सहसमन्वयक डॉ. रवींद्र सरोदे उपस्थित होते. बीजभाषण करतांना डॉ. चेनॉय म्हणाल्या, डॉ. भाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. कृषीमंत्री म्हणून त्यांनी वॉशिंग्टन, रोम आणि सिलोन येथे झालेल्या अन्न व कृषी संघटना परिषदेच्या शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले. संविधान सभेत सदस्य म्हणून काम करतांना बहुजन व तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भारत कृषीप्रधान देश असूनही येथील कृषीची अवस्था वाईट आहे, हे ओळखून त्यांनी कृषी समृध्दीसाठी विदेशी तंत्रज्ञान भारतात आणले. हरित क्रांती होण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. भारत कृषक समाजाची स्थापना करुन त्यांनी शेतक-यांचा आवाज बळकट केला. कर्ज घेऊन शिक्षण संस्था उभारली, त्यामुळे तळागाळातील गरीबांची मुले शिकू शकली. सार्वत्रिक शिक्षणावर त्यांनी त्याकाळी भर दिला. त्यांचे कृतीशील नेतृत्व होते. ख-या अर्थाने ते राष्ट्रनिर्माते आहेत. केंब्रिाज विद्यापीठामधून, वैदिक साहित्यातील धर्माची उत्पत्ती आणि विकास या विषयावर पी.एच.डी. केली. शेतक-यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रतिकुल काळामध्ये समता राखण्यासाठी, शेतक-यांच्या जमिनी वाचविण्यासाठी, सावकारांपासून त्यांचे संरक्षण करण्याकरीता, शेतक-यांना सुलभ कर्ज, साठवणुकीची उत्तम साधने, चांगले बियाणे, प्रशिक्षण, लागवडीच्या चांगल्या पध्दती आदींबाबत त्यांनी भरीव कामगिरी शेतक-यांसाठी केली आहे.
उद्घाटन झाल्याची घोषणा श्री इंगोले यांनी केली. उद्घाटनानंतर बोलतांना इंगोले म्हणाले, श्री शिवाजी शिक्षण संस्थेची डॉ. भाऊसाहेबांनी स्थापना करुन बहुजन आणि तळागाळातील शेतकरी व कष्टकरी गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. भारताचे कृषीमंत्री, घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. कृषी क्रांतीचे जनक म्हणून त्यांचा गौरव आजही होतो. शेतक-यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान व नवीन बियाणे त्यांनी पोहचविल्यामुळे कृषी उत्पादनात भारत आज स्वयंपूर्ण झाला आहे. भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. अंबादेवी मंदीर दर्शनासाठी सर्वांकरीता खुले केले. शेतक-यांच्या समस्या सोडविल्या. महत्वाचे म्हणजे स्थापन केलेल्या संस्थेत त्यांनी नातेवाईकांना स्थान दिले नाही. पंजाब, हरियाणातील शेतक-यांच्या घरी भाऊसाहेबांचा आजही फोटो दिसतो. त्यांना तेथील शेतकरी आजही मानतात. संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसमवेत त्यांनी कार्य केले. दिल्ली विद्यापीठात भाऊसाहेबांचा पुतळा उभारणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.प्रमुख अतिथी डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले, राष्ट्रउभारणीत भाऊसाहेबांचे फार मोठे योगदान आहे. शेती आणि मातीशी त्यांचे घट्ट नाते होते. शेतक-यांच्या मुलाने शिकले पाहिजे, यासाठी त्यांंनी विदर्भात शिक्षणाची सोय ग्रामीण भागापर्यंत पोहचविली. त्याचा परिणाम म्हणून त्याकाळी जी.ई.आर. वाढण्यास मदत झाली. डॉ. व्ही.एम. मेटकर म्हणाले, भाऊसाहेबांचे कार्य तरुण पिढीपर्यंत पोहचले पाहिजे, देशाचा व समाजाचा विकास व्हावा, यासाठी त्यांनी शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, भाऊसाहेब दूरदृष्टीचे नेते होते. राष्ट्रविकासामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. देश घडविण्यासाठी त्यांनी कार्य केले. शिक्षणमहर्षि, कृषीतज्ज्ञ, विधिज्ञ, राजनेता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध आयाम आहेत. समाजसेवेमध्ये त्यांनी फार मोठे योगदान दिले. आंतरराष्ट्रीय कृषी संमेलन आयोजित करुन विदेशातील तंत्रज्ञान देशात आणले. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. 92 रिसर्च पेपर आजच्या परिषदेत सादर करण्यात आले. भाऊसाहेबांचे विचार, त्यांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे, त्यांच्या पाऊलवाटेवर वाटचाल करावी, त्यांचे स्वप्न प्रत्येकाने पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.
