नागपूर, – आकाशवाणी नागपूर केंद्र आणि दूरदर्शन नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आकाशवाणी नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश कुमार घरडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पियुष पौनीकर आणि सायबर सिक्युरिटी तज्ञ सुनील सदाशिवन उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून रमेश घरडे यांनी, महिला या घर आणि ऑफिस अशा दोन्ही पातळीवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची क्षमता ठेवतात असं प्रतिपादन केलं.
या कार्यक्रमाप्रसंगी प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल तर्फे सर्व महिलांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं, यात रक्तदाब, मधुमेह आणि विविध चाचण्यांचा समावेश होता. यानंतरच्या कार्यक्रमात सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ सुनील सदाशिवन यांनी बाहेरच्या जगात वावरताना महिलांनी सायबर सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं. डॉ.पियुष पौनीकर यांनी आर्थिक गुंतवणूक ही महिलांसाठी किती महत्त्वाची आहे,याविषयी व्याख्यान दिलं.
याप्रसंगी कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध खेळांचे आणि स्पर्धांच आयोजनही करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे आयोजक, कार्यक्रम प्रमुख, रचना पोपटकर- गजभिये आणि कार्यक्रम अधिकारी समन्वय संगीता अरजपुरे होत्या. कार्यक्रम अधिकारी विजयसिंग राजपूत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले तर संचालन वैदेही चवरे यांनी केले.
