चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या मक्कल निधी मैयम(एमएनएम) पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी डीएमकेच्या नेतृत्त्वातील आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. याचा मोबदला म्हणून डीएमके 2025 च्या राज्यसभा निवडणुकीत एमएनएमला एक जागा देणार आहे. कमल हासन यांनी आज, शनिवारी ही माहिती दिली.
कमल हासन यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर हासन म्हणाले की, देशाच्या हितासाठी आपण डीएमकेच्या नेतृत्वातील आघाडीची निवड केलीय. आपल्याला कुठल्याही पदाची लालसा नाही. तसेच एमएनएम लोकसभा निवडणूक देखील लढवणार नाही. परंतु, डीएमकेच्या आघाडीला आमचा पूर्ण पाठइंबा राहिल. तसेच निवडणुकीत एमएनएम आघाडीतील सहकारी पक्षांना प्रचारात मदत करेल. लोकसभा निवडणुकीत एमएनएम राज्यातील लोकसभेच्या 39 जागांवर डीएमके आघाडीचा प्रचार करणार असल्याचे कमल हासन यांनी सांगितले.
