नाशिक, – गंगापूररोड येथील शंकराचार्य संकुल येथे राष्ट्रीय बुध्दीबळ निवड स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. या स्पर्धेतील विजेते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अनेक ग्रँडमास्टर , इंटरनॅशनल मास्टर ,वूमन ग्रँडमास्टर सहभागी होत असल्याने या खेळाडूंचा खेळ बघण्याचे भाग्य नाशिककरांना या निमित्ताने मिळणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्यावेळी निर्मला सितारामन यांनी भारतीय बुद्धीबळपटुंच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. त्या खेळाडुंना प्रत्यक्ष बघण्याचे भाग्य या स्पर्धेमुळे नाशिककरांना मिळणार आहे. विविध ऑनलाईन व्यासपीठावर या स्पर्धा बघता येणार आहेत
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यामुळे याही वर्षी राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेस मिळाला आहे. भारतीय क्रिडा मंत्रालय, भारतीय क्रिडा प्राधिकरण, अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ आणि महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जलद आणि अति जलद प्रकारातील सामने या ठिकाणी होणार आहेत.या स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असून प्रत्येक खेळाडू ११ डाव खेळेल. येत्या गुरुवारपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून रतिरम अंतराम कार्य करणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे निरंजन गोडबोले, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा, प्रा. विनायक गोविलकर, प्रविण कुलकर्णी, इंडिया इन्फोलाईन सिक्युरीटी लिमिटेडचे सुहास तारे, बाग डेव्हलपमेट आणि बिल्डरचे मनोज बाग, सागर स्वीटचे दिपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चैताली बेळे कुलकर्णी यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे खजिनदार जयेश भंडारी, जयराम सोनवणे, अजिंक्य तरटे, सचिन व्यवहारे, मंगेश गंभीरे आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
