नागपूर, मार्च : मिस वर्ल्ड स्पर्धेतील परदेशी स्पर्धकांनी नागपुरातील संघ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोलवलकर गुरुजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी नागपूरला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तब्बल 28 वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होत आहे. आगामी 9 मार्च रोजी या स्पर्धेचा ग्रॅंड फिनाले आहे. त्यापूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी भेट देत आहेत. या स्पर्धेतील 6 स्पर्धक तरुणींनी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिआ मोरले यांच्यासह स्मृति मंदिर परिसराला भेट दिली. त्यांनी यावेळी संघ कार्य व सेवाप्रकल्पांबाबत जाणून घेतले. त्यांनी यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या सामाजिक कार्य अनुभवदेखील सांगितले. स्मृतिमंदिर परिसरातील संघाचे अधिकारी विकास तेलंग यावेळी उपस्थित होते. संघ कार्यालयाला स्पर्धकांनी दिलेल्या भेटीचे फोटो मिस वर्ल्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरदेखील शेअर करण्यात आले आहेत.
या स्पर्धकांमध्ये कॅरोलिना तेरेसा बैलावस्का, सिल्विहा व्हॅनेस्सा पोन्से डे लिओन सांचेझ, जेसिका गॅगेन, सिनी सदानंद शेट्टी, पॉला सांचेझ, क्रिस्टिन राईट, क्लाऊडे मनागाका मशेगो व व्हिक्टोरिआ जोसेफिन्मे डी सोर्बो यांचा समावेश होता. संघस्थानी येऊन मला आनंद होत आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत त्यांचे कार्य जाणून मी प्रभावित झाली अशी भावना भारताची स्पर्धक सिनी शेट्टी हिने व्यक्त केली. या स्पर्धेत 120 देशांच्या स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धक तरुणींनी चंद्रपुरात आयोजित ताडोबा फेस्टिव्हलमध्येदेखील सहभाग नोंदविला.
