मुंबई, 24 फेब्रुवारी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून मूषक विनाशक विशेष मोहिमेअंतर्गत दादर, माहीम आणि धारावी भागामध्ये २,०८० मूषकांचा नायनाट करण्यात आला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात उंदरांचा नायनाट करण्याचा हा आजवरच्या मोहिमेमधील उच्चांक आहे.
परिसर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अविरतपणे विविध उपाययोजना केल्या जातात. सर्व प्रशासकीय विभागांमध्ये मूषक नियंत्रणाची कार्यवाही नियमितपणे सुरू असते. नागरिकांकडून प्राप्त तक्रारींनुसार, घरांमध्ये मूषक सापळे लावून अथवा घराबाहेरील परिसरात बिळांमध्ये नाशक गोळ्या टाकून मूषक नियंत्रणाची कार्यवाही नियमितपणे केली जाते. मूषकांचा उपद्रव असलेल्या परिसरात सर्वेक्षण घेऊन त्या ठिकाणी मूषक नियंत्रणाची विशेष मोहीम राबविली जाते.
याच धर्तीवर कीटकनाशक विभागाच्या वतीने गुरुवारी (२२ फेब्रुवारी) ‘जी उत्तर’ विभागातील दादर, माहीम आणि धारावी परिसरात मूषक नियंत्रण विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत या परिसरातील एकूण ९,०६५ बिळांमध्ये झिंक फॉस्फाईड व सेलफॉस आणि ५५ किलो गव्हाच्या पिठाचे मिश्रण असलेल्या गोळ्या टाकण्यात आल्या. त्यानंतर दुसऱया दिवशी २,०८० मृत मूषक गोळा करण्यात आले. या परिसरामध्ये फेब्रुवारी २०२३ पासून आतापर्यंत अशाप्रकारच्या चार विशेष मोहीम राबविण्यात आल्या असून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मूषकांचा नायनाट करण्यात आला आहे.
‘जी उत्तर’ विभागाचे कीटक नियंत्रण अधिकारी, १३ पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि ४५ कामगारांच्या चमूने नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करत ही कार्यवाही पूर्ण केली.
