सोलापूर 20 फेब्रुवारी : हातउसनी घेतलेली रक्कम परत देण्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने माढा न्यायालयाने धनादेश देणा-याला नुकसानभरपाई म्हणून साडेपाच लाख रुपये व एक वर्षाची साधी शिक्षा ठोठावली आहे. नुकसानभरपाई न दिल्यास आणखी दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी आनंद गोडसे (रा. तांबवे, ता माढा) व संशयित आरोपी सौदागर गोडसे (रा. इंदापूर) हे चुलत भाऊ आहेत. सौदागर गोडसे यांनी फिर्यादीकडून २०१२ मध्ये शेती खर्चासाठी ३ लाख ४५ हजार रुपये हातउसने घेतले होते. ते परत देण्यासाठी सौदागर गोडसे यांनी फिर्यादीस तेवढ्या रकमेचा धनादेश दिला होता.पुरेशा निधी अभावी तो धनादेश वटला नाही. फिर्यादीने कुर्डुवाडी येथील अँड. प्रमोद पलसे यांच्या मार्फत नोटिस बजावून सौदागर याच्याकडून रकमेची मागणी केली परंतु ती न मिळाल्याने माढा येथील न्यायालयात केस दाखल केली. न्यायदंडाधिकारी जी. व्ही. गांधे यांनी सौदागर यास दोषी ठरवून १ वर्ष साधे तुरुंगवासाची व नुकसान भरपाई साडेपाच लाख रुपये फिर्यादीस निकाल लागल्याच्या तारखेपासून एक महिन्यात देण्याची शिक्षा सुनावली. फिर्यादी आनंद गोडसे तर्फे ॲड. प्रमोद पलसे व ॲड. विनोद दरगड यांनी काम पाहिले.
