रायपूर, १८ फेब्रुवारी – जैन धर्मियांतील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे छत्तीसगडच्या डोंगरगड येथे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निर्वाण झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यानंतर आज, रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर डोंगरगड येथील चंद्रगिरी पर्वतावर जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज पंचत्त्वात विलीन झाले. आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे निर्वाण झाल्याने जैन धर्मिय आणि त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निर्वाणानंतर राज्य सरकारकडून अर्ध्या दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि यावेळी राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी निर्यापक श्रमण योगसागर महाराज यांच्याशी चर्चा करून मुनिसंघ कार्यातून निवृत्ती घेत आचार्यपदाचा त्याग केला. आचार्य विद्यासागर महाराज यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रह्मलीन झाले.
डोंगरगडच्या चंद्रगिरी पर्वतावर आचार्य विद्यासागर महाराज यांचे समाधी स्थान बांधले जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांतून जैन समाजाचे लोक येथे येतात. रविवारी येथे हजारो जैन बांधव आणि अनुयायांनी आचार्य विद्यासागर महाराज यांना भावपूर्ण निरोप दिला.
