दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधीत प्रकरण
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक समन्स बजावले आहे. मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधीत प्रकरणात ईडीने बजावलेले हे सहावे समन्स असून केजरीवाल यांना 19 फेब्रुवारी रोजी चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ईडीने केजरीवाल यांना यापूर्वी 5 वेळा समन्स बजावले होते. परंतु, मुख्यमंत्री एकदाही ईडी कार्यालयात गेले नाही. त्यामुळे ईडीने याप्रकरणी न्यायालयात याचिका देखील टाकली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना 5 समन्स पाठवण्यात आले आहेत. पण आतापर्यंत त्यांनी या समन्सला योग्य उत्तर दिलेले नाही. केजरीवाल अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. गेल्या 7 फेब्रुवारी रोजी ईडीने या प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी केली. तसेच अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन आणि सहावे समन्स जारी केले आहे, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
