जागतिक मंदी आणि आर्थिंक संकटाचा दुष्परिणाम
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : जागतिक मंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या स्पाईस-जेट विमान कंपनीत कर्मचारी कपातीचे संकट उभे ठाकले आहे. स्पाईस जेट लवकरच 1400 कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करणार असल्याची माहिती कंपनीतील सूत्रांनी दिली. आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असलेल्या स्पाईस-जेटने स्वतःवरील बोजा कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्पाईस-जेट एअरलाईन्समधून 1,400 कर्मचाऱ्यांना कामाहून काढले जाणार आहे. जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 15 टक्के इतके आहे. सध्या कंपनीचे एकूण कर्मचारी 9 हजारांच्या आसपास आहेत. कंपनी सध्या सुमारे 30 विमाने चालवतात, त्यापैकी 8 भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. अहवालानुसार, गुंतवणूकदारांचा विश्वास जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं सॅलरी बिल तब्बल 60 कोटींचे आहे. अशा परिस्थितीत कंपनी खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कर्मचारी कपात देखील खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना अजुनही जानेवारी महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कंपनी काही गुंतवणूकदारांकडून 2 हजार 200 कोटी रुपयांचं कॅपिटल इंफ्यूजनच्या प्रक्रियेत आहे. सध्या जागभरात टाळेबंदीचा वेग वाढला आहे. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सिस्को यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. दरम्यान, जगभरात सुरू असलेल्या छाटणीचा सर्वात जास्त परिणाम टेक कंपन्यांवर होत आहे. एका अहवालानुसार, एकट्या जानेवारीमध्ये टेक कंपन्यांनी 32 हजारांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
