सिंधुदुर्ग, 11 फेब्रुवारी : काथ्या पासून बनविलेल्या वस्तूंची १८ हजार कोटीची उलाढाल प्रती वर्षी होते. ४ हजार कोटीची उत्पादने देशाबाहेर परदेशात विकली जातात. २ हजार ५०० कोटीची अगरबत्ती परदेशात विकली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत आपण कोठे आहोत याचा विचार केला पाहिजे. कोकणातील जनतेने या सर्वाचा फायदा घ्या. क्वायर बोर्ड व्यवसायाचे भाग बना. उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आहेत ती आत्मसात करा, असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्डचे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राणे बोलत होते.
सुरुवातीला कॉयर बोर्डाच्या वस्तू प्रदर्शन दालनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कॉयर बोर्डचे चेअरमन डी कप्पूरामु, सेक्रेटरी जे.के. शुक्ला,मार्केटिंग झोनल ऑफिसर पी. जी. तोडकर, जनरल ऑफिसर गीता भोईर, मॅनेजर श्रीनिवास बिटलिंगु, असिस्टंट मॅनेजर गड्डम स्वामी, सेल्समन राधिका पावसकर, बाजीराव सानप, डॉक्टर सचिन बदाने, बन्सीधर भोई आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अपेक्षित उद्योजक घडत नाहीत. अशी खंत व्यक्त करतानाच केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २०० पेक्षा जास्त महिला कॉयर मध्ये उद्योग करण्यासाठी पुढे आल्या याचे मला समाधान आहेअसे सांगितले. नारळ आणि कॉयर त्याच्या पासून बनविण्यात येणारी उत्पादने फारच उपयोगी आहेत. अनेक उत्पादने घेता येतात. त्याचा वापर बँकेत पैसे जमा होतील असा केला पाहिजे. यापुढे तो वापर केला जाईल अशी अपेक्षा करतो. मी ओसरगाव मध्ये महिला भवन उभारले. आज घडीला तेथे अनेक फळांपासून उत्पादने बनवली जात आहेत. महिलांना स्वतःची उत्पादने घेता येत आहेत. त्याच पद्धतीने कॉयर क्षेत्रात अनेक उत्पादने घ्या आणि स्वावलंबी बना असे आवाहन केले.
चहा पत्ती पासून बनलेले तेल ९०० रुपये लिटर विकले जाते. बांबू पासून इथोनोल बनविले जाणार आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करा आणि या उद्योगात सामील व्हावा. पैसा मिळविण्याच्या मार्गाने चला. त्यासाठी चांगला मार्ग आम्ही दाखवत आहोत त्याचा वापर करा. आणि उद्योग करा. गरिबातील गरीब माणूस आज श्रीमंत झाले. रस्त्यावर कपडे विकणाऱ्या माणसाने २ हजार करोड रुपयांचे भागभांडवल केले. तुम्ही सुध्दा अशाच पद्धतीने काम करा.नोकरीवर अवलंबून राहू नका. नोकरीत १५ हजार रुपये मिळतात त्यावर अवलंबून राहू नका.धीरूभाई अंबानी यांनी १५०० रु.भागभांडवल घेवून व्यवसाय सुरू केला होता. आज त्या कंपनीचे ८ लक्ष कोटी रुपयांचे भागभांडवल आहे.असे यशस्वी व्हा. तुम्ही दोनशे लोक आहात.तुमची आसोशियेशन केले जाईल. ज्यामुळे तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते त्या माध्यमातून सोडवू .
मी सुद्धा व्यावसायिक आहे.रात्र शाळेत शिकलो. छोटे मोठे व्यवसाय केले. व्यवसायिक म्हणून काम करतो. राजकारणातून पैसे मिळवत नाही. वडीलांच्या नावे तातू राणे ट्रस्ट केली आहे. त्यात जे व्याज येते त्यातून मुलांना शिक्षणासाठी,उपचारासाठी मदत करतो. जे माझ्यावर टीका करत आहेत ते एक रुपया तर जनतेसाठी खर्च करत आहेत काय ? असा सवाल राणे यांनी केला,.
