रत्नागिरी, 8 फेब्रुवारी, : शहरातील नाचणे पावर हाऊस येथे आज सायंकाळी ६ च्या सुमारास एक मोठा अपघात घडला. भरधाव वेगात एका इव्ही कारने पाच दुचाकींना उडवले.
या अपघातात ही मोटार एका विजेच्या खांबावर आदळली व या गाडीचे चाक अक्षरशः तुटून पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चार दुचाकी चालकांना दुखापत झाली आहे.
कारचालक दर्शन जैन रत्नागिरीतील असून त्यांनादेखील दुखापत झाली आहे. गाडी चालवत असताना पाण्याची बाटली पायात पडली. ती उचलताना ॲक्सिलेटरवर पाय पडल्याने गाडीचा वेग अचानक वाढला, अशी माहिती मोटारचालकाने अपघातानंतर दिली आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अपघातातील जखमींना इस्पितळात हलवण्यात आले असून या अपघाताबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
