रांची, 07 फेब्रुवारी : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आलीय. जमीनीशी संबंधीत मनी लाँड्रिंगच्या आरोपात सोरेन यांना ईडीने अटक केलीय. तत्पूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पीएमएलए कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे.
ईडीच्या चौकशीत सोरेन यांना त्यांचा सहकारी बिनोद सिंग याच्याशी व्हॉट्सऍपवरील जमिनींच्या देवानघेवाण, कागदपत्रांच्या चॅटवरून प्रश्न विचारण्यात आले. या चॅट्समध्ये अनेक मालमत्तांशी संबंधित गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसेच ट्रान्सफर पोस्टिंग, सरकारी रेकॉर्डची देवाणघेवाण इत्यादींशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. बिनोद सिंग यांनी अधिकाऱ्यांची बदली पोस्टिंग, झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे आयोजित स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची अनेक प्रवेशपत्रे मागविणे आणि शेअर करणे या संबंधात इतर अनेक लोकांशी व्हॉट्सॲप चॅट केले आहेत. यावरही ईडीला कारवाई करायची आहे.
हेमंत सोरेन न्यायालयात हजेरीसाठी पोहोचले असता, न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जेल का ताला टूटेगा, हेमंत सोरेन छूटेगा, अशा घोषणा दिल्या. ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांना 3 फेब्रुवारी रोजी रिमांडवर घेतले होते. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे.
