सोलापूर 4 फेब्रुवारी : सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात दोन्ही संघातील फिरकीपटूंनी दिवस गाजविला. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघापुढे २०८ धावांचे लक्ष्य ठेवले असून आज निकाल अपेक्षित आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाचा २९ षटकात ७ गडी बाद ११६ धावावरून पुढे चालू झाला असता, पहिल्या सत्रात खेळाची सुरुवात तरणजीतसिंग डील्लन आणि अझीम काझी यांनी केले परंतु दुसऱ्या दिवशीच्या ६ व्या षटकातच महाराष्ट्र संघाचा ८ वा गडी बाद झाला.
अझीम काझी युवरासिंग दोडियाचा शिकार बनला. त्यानंतर तरणजीतसिंग डील्लन याने २१ धावा केल्या असता, पार्थ भुट द्वारे पायचीत झाला. हितेश वाळुंज याने १३ धावा केल्या. महाराष्ट्र संघ एकूण ४५ षटकात १५९ धावांवर गारद झाला. सौराष्ट्र संघाला पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी मिळाली.सौराष्ट्र संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच प्रदिप दाढे याने हार्विक देसाई शून्य वरती यश्टीरक्षक विशांत मोरे द्वारे झेलबाद करत तंबूत परत पाठवले. त्यापाठोपाठ केविन जिवराजानी चौथ्या षटकात हितेश वाळुंजने प्रदिप दाढे द्वारे झेलबाद करत परत पाठवले. त्यानंतर सौराष्ट्र संघाची अवघ्या १० षटकात ५ बाद १६ धावा अशी अवस्था झाली. चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा प्रेक्षकांना निराश केले. विश्वराजसिंह जडेजा आणि पारेख मंकड यांनी पुन्हा एकदा सौराष्ट्र संघाचा डाव सावरत ६ व्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. परंतु विश्वराजसिंह जडेजा वैयक्तिक ३९ धावांवर खेळत असताना हितेश वाळुंज याचा चेंडू थेट स्टंपवर जावून आदळला. त्यापाठोपाठ धर्मेंद्र जडेजा सुद्धा लगेच २१ धावांवर शिकार झाला.
