रत्नागिरी, 3 फेब्रुवारी, : येत्या २० फेब्रुवारी ते २० मार्च या काळात कोल्हापूर येथे होणार असलेल्या बासष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत गोव्यासह राज्यासह २१ नाटके सादर होणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सात संस्थांनी सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ही स्पर्धा कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, सांगली आणि गोव्यातील संगीत नाट्य प्रयोग रसिकांना पाहावयास मिळणार आहेत.
पहिल्या दिवशी २० फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता पुण्यातील भरत नाट्य मंदिर संस्थेचे जयवंत दळवी लिखित व रवींद्र खरे दिग्दर्शित लावणी भुलली अभंगाला हे नाटक होणार आहे. दुसऱ्या दिवशी दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे संभवामि युगे युगे, २२ ला कलारंग नाट्य प्रतिष्ठान, वरवडे-खंडाळा संस्थेचे धाडिला राम तिने का वनी, १ मार्च रोजी परस्पर सहाय्यक मंडळ-वाघांबे (गुहागर) संस्थेचे जय जय गौरी शंकर, ४ मार्चला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे ययाति देवयानी, ५ ला खल्वायनचे संगीत अमृतवेल, ९ मार्चला समर्थ थिएटरचे चला आळंदीला, १८ ला श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळाचे संगीत वारी ही रत्नागिरी जिल्ह्यातील नाटके सादर होणार आहेत.
