राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नागपूर, 31 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात गृहमंत्र्यांचे होम-टाऊन असलेल्या नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांची नेमणूक करण्यात आलीय. तर नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यात बदली झाली आहे.
डॉ. रविंद्र कुमार सिंघल 1996 मध्ये भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. त्यानंतर 1998 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली. तर 1999 मध्ये त्यांची अमरावती शहर डीसीपी म्हणून नियुक्ती झाली. अमरावती येथे 3 वर्षांच्या सेवेनंतर ते नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. एसपी नाशिक या म्हणून त्यांनी 2003 साली त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याचे संपूर्ण पोलीस व्यवस्थापन त्यांच्या टीमसह सांभाळले. तसेच 2007 ते 2009 या काळात त्यांनी गुरु ता गद्दी तेर शताब्दी सेलिब्रेशन’ या मोठ्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले होते. यासाठी देश-विदेशातून प्रचंड जनसमुदाय नांदेड जिल्ह्यात (महाराष्ट्र) आला होता.आपल्या आयुष्यातील यश आणि समाजाचे जवळून निरीक्षण करून मिळालेला अनुभव शेअर करण्यासाठी डॉ. रविंद्र सिंघल यांनी एक वेबसाइटही तयार केली आहे. येथे त्यांनी त्यांच्या जीवनाशी निगडित काही प्रसंग आणि त्यांचे विचार मांडले आहेत.
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीने नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नागपुरचे पोलिस आयुक्त मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
