पुणे , 27 जानेवारी :शिवाजीनगर येथील आशा नगर येथे पुणे महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटपट झाली. त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर देखील पोलिसांनी दादागिरी केली. त्यामध्ये कॅमेऱ्याचे नुकसान झाले, पत्रकारांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना उचलून नेण्यात आले, तर एका कॅमेरामनला पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट गाडीमध्ये डांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.पुणे महापालिकेने सुमारे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून अशानगर येथे बारा लाख लिटर पाण्याची टाकी बांधलेली आहे. या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले होते.
