भंडारा २५ जानेवारी : पूल बांधकाम करण्यासाठी एक कंत्राटदार चक्क बालमजुरांचा उपयोग करत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सासरा येथे उघड आला आहे. एकीकडे 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे काही तास उरले असताना दुसरीकडे शिक्षणाला मुकुन चिमुकले बालमजुरीला जुंपले गेल्याचा विपर्यास पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांचे पालक म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी स्वतः या गंभीर प्रकाराला अनभिज्ञ असल्याने जिल्हा प्रशासन रामभरोसे चालत असल्याचे समोर आले आहे. ही बालकांवर आलेली परिस्थिती बघता खरच आपल्याला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अधिकार आहे का ? हा प्रश्न खऱ्या अर्थाने उपस्थित होत आहे.
ही मुले पाईपने पाणी टाकतं असल्याचे बघा! तुम्हाला प्रश्न पडला असेल शाळेत जाण्याचे सोडून हे चिमुकले इथे काय करत आहेत. खरे तर हे मुले गरीबीशी दोन हात करत स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मजूर करीत आहे. ही चित्र बघून तुम्हाला डिजिटल भारताचे खरे दृश्य दिसून येणार आहे. 16 कोटी रुपये खर्च करून साकोली – लाखनी तालुक्याला जोडणारा, सासरा-मिरेगाव चुलबंद नदीवर पूल बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी खरे तर वयस्कर मजुरांचा वापर करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. पैसे बचत व्हावी व लाभ अधिक व्हावा यासाठी कंत्रादाराने चक्क बालमजुरांचा वापर सुरू केला आहे. अल्पदरात बालमजूर उपलब्ध होत असल्यामुळे कंत्राटदाराने या बालमजुरांचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे हे नियमबाह्य कार्य हा कंत्राटदार कोणालाही न घाबरता दिवसाढवळा करीत आहे. तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही सुरक्षा किट देण्यात आली नाही. विशेष बाब म्हणजे की एक अभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्य अभियंता अशा जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखित हे पुलाचे बांधकाम होत असले तरी या अधिकाऱ्यांना हे बालमजूर दिसले नाही का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आपल्याला याची माहिती नसल्याची उडवा उडवीचे उत्तर त्यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे. मात्र रोज तपासणी होत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अधिकाऱ्यांना हे बालमजूर दिसले नाही किंवा त्यांच्या मुखसंमतीनेच हे बालमजूर काम करीत तर नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, या चिमुकल्यांचे पालक म्हणून जबाबदारी असलेले भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याही निदर्शनात ही बालमजुरीची बाब लक्षण आणून दिली असता त्यांना आपल्याला हा प्रकार माहित नसल्याचे सांगितले आहे. आपण याची माहिती घेऊन दोषीवर कारवाई करणार असल्याचे सांगितल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र पालक रुपी जिल्हाधिकारीच या बालमजुरीच्या प्रकाराशी अनभिज्ञ असेल तर जिल्ह्याचे प्रशासन नक्कीच रामभरोसे चालत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बालमजुरीचा प्रकार निदर्शनास आल्याने कमीत कमी आता काय कारवाई जिल्हाधिकाऱ्यामार्फत केली जाते हे पाहणे विशेष महत्त्वाचे ठरेल.
