सोलापूर , 19 जानेवारी (हिं.स.) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूरातील कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्रीगण उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या भाषणाने झाली. मात्र, आडम यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. आडम मास्तरांनी भाषणात उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी आपली चूक सुधारली आणि त्या क्षणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंचावरुनच माफी देखील मागितली.
या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलं. यावेळी बोलताना नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले त्याचबरोबर त्यांचं कौतुकही केलं आहे. तर पंतप्रधान मोदी दिलेल्या शब्दाला जागले म्हणत आज सोलापुरात दिवाळी आणि रमजान साजरा होत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्थान समाचार
