सोलापूर, 16 जानेवारी, (हिं.स.) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अशात सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस राजकीय वातावरण भर थंडीत तापणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 तारखेला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. 14 तारखेला महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने नुकतेच आपली मोठ बांधली आहे. आता मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनच्या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या 17 जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सोबतच, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये देखील सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये ही सभा होणार आहे. याच काळात शरद पवार देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे.
हिंदुस्थान समाचार
