रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे येत्या रविवारी (दि. २१ जानेवारी) सकाळी ८ वाजता चिपळूण-गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी एक धाव देशासाठी ही यावेळच्या मॅरेथॉनची संकल्पना आहे.
डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव भागवत माध्यमिक व कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गताम्हाणे येथे ही चिपळूण-गुहागर तालुक्यासाठी मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी १० वर्षांखालील गटासाठी २ किलोमीटर अंतर असून रोख बक्षिसे ३ हजार, २ हजार, १ हजार रु. १४ वर्षांखालील गटासाठी ५ कि.मी. अंतर असून ४ हजार, ३ हजार, २ हजार रु., १८ वर्षांखालील गटासाठी ७ कि.मी. अंतर असून ५ हजार, ३ हजार, २ हजार अशी पारितोषिके आहेत. १८ वर्षांवरील खुल्या गटासाठी १० कि.मी. अंतर असून ५ हजार, ३ हजार, २ हजार रु. रोख पारितोषिके आणि सुवर्ण, रौप्य, कास्यपदक, प्रशस्तीपत्र, सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
चिपळूण-गुहागर तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे. मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी चिपळूण-गुहागर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक, प्राथमिक शाळांना सहभागाचे आवाहन केले आहे. स्पर्धेत सहभाग नोंदणीसाठी प्रा. डॉ. सत्येंद्र राजे, राकेश दांडेकर यांच्याशी संपर्क साधावा.
हिंदुस्थान समाचार
