सर्वोच्च न्यायालयाने केला हायकोर्टाचा आदेश स्थगित
नवी दिल्ली, 16 जानेवारी (हिं.स.) : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीची पाहणी करण्यासाठी आयुक्त (कोर्ट कमिशनर) नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारील शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती. त्याविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भगवान श्री कृष्ण विराजमान आणि इतर 7 लोकांनी हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभास पांडे आणि देवकी नंदन या वकीलांमार्फत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शाही ईदगाहमधील सर्वेक्षणाची मागणी करत एएसआय सर्वेक्षणाची मागणी केली होती. याचिकेत दावा करण्यात आला आहे की भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मशिदीच्या खाली आहे आणि मशीद हिंदू मंदिर असल्याचे अनेक चिन्हे आहेत.
हिंदुस्थान समाचार
