रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : भाजपाचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दापोलीचा गजानन संघर्ष संघ विजेता ठरला.
विठ्ठल- रखुमाई मित्रमंडळ आणि भाजप कबड्डी असोसिएशनने ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत दापोलीच्या संघाला विजेतेपद, तर दसपटी, चिपळूण संघाला उपविजेतेपद मिळाले. माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अंतिम सामना फारच चुरशीचा झाला. क्रीडा रसिकांनी भरभरून दाद दिली. विजेत्या संघाला ५१ हजार रुपये आणि चषक, तर उपविजेत्या संघाला २५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत तृतीय क्रमांक महापुरुष, रत्नागिरी संघाला १५ हजार रुपये, चौथ्या विजेत्याजय हिंद जय आबा संघाला दहा हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला बाळ माने, अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, राजू मयेकर, दादा ढेकणे, अमित विलणकर, बावा नाचणकर, मुन्ना खामकर, हेमंत शेट्ये, मंदार खंडकर प्रमुख उपस्थित होते. या वेळी माजी खासदार राणे यांनी सांगितले की, मुंबईच्या धर्तीवर तेवढ्या दर्जाचे कबड्डी सामने रत्नागिरीमध्ये भरवण्यात आले, हे कौतुकास्पद आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकेत मयेकर, विठ्ठल-रखुमाई मंडळाचे कार्यकर्ते पराग हेळेकर, प्रवीण हेळेकर, भाई चव्हाण, साई टिकेकर, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, मंदार मयेकर, मनोज फणसोपकर, वैभव हेळेकर, अवधूत शेट्ये, सुनील सावंत आदींनी मेहनत घेतली.
हिंदुस्थान समाचार
