श्रीनगर, 12 जानेवारी (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये आज, शुक्रवारी जिहादी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. पुंछ जिल्ह्यातील खनेतर भागात संध्याकाळी झालेल्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. सध्या या भागात गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार पुंछमधील रस्त्यालगत असलेल्या टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर 2 राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेत सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले. गोळीबारानेतर दहशतवाद्यांनी पळ काढला असून त्यांचा शोध सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी राजौरीतील डेरा गल्लीत 2 लष्करी वाहनांवर झालेल्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले होते, तर 5 जण जखमी झाले होते. दरम्यान आज संध्याकाळी झालेला हल्ला हा पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर झालाय. जम्मू-काश्मीरचा पीर पंजाल रेंज अंतर्गत राजौरी आणि पुंछ सेक्टर 2003 पासून दहशतवादापासून मुक्त होता. परंतु ऑक्टोबर 2021 पासून येथे पुन्हा मोठे हल्ले सुरू झाले आहेत. गेल्या 7 महिन्यांत येथे 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर गेल्या 2 वर्षांत 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत.
हिंदुस्थान समाचार
