मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) : मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच अटल सेतू मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, शुक्रवारी लोकार्पण झाले. देशातील सर्वात लांब सागरी सेतू अशी या पुलाची ओळख होणार आहे. यावेळी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या पुलाच्या बांधकामामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणी सुलभ होणार आहे.
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2016 मध्ये करण्यात आली होती. तब्बल 17,840 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. पंतप्रधानांनी आज, शुक्रवारी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला केला. हा पूल अंदाजे 21.8 किमी लांबीचा आणि 6 लेनचा असून पुलाची लांबी 16.5 किलोमीचर आहे. हा पूल समुद्रावर आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी बांधला आहे. या पुलामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या सागरी सेतूच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. अटल सेतूच्या बांधकामात सुमारे 177,903 मेट्रिक टन स्टील आणि 504,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे. अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधले गेले. या पुलावरून दररोज सुमारे 70,000 वाहने ताशी 100 किमी वेगाने धावतील आणि 100 वर्षे तो कार्यरत राहील. प्रकाशाचे खांब पावसाळ्यात उच्च-वेगाचे वारे सहन करण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेले आहेत. विजेमुळे होणार्या संभाव्य नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी लाइटनिंग प्रोटेक्शन सिस्टीमही बसवण्यात आली आहे. पुलाचा भाग फ्लेमिंगो संरक्षित क्षेत्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्रातून जात असल्याने शिवडीपासून 8.5 किमी लांबीचा ध्वनी अवरोधक बसवण्यात आला आहे. हा पूल पूर्ण करण्यासाठी एकूण 5,403 मजूर आणि अभियंते दररोज काम करत होते.
हिंदुस्थान समाचार
