बेळगाव, 12 जानेवारी (हिं.स.) : कर्नाटकच्या बेळगावी येथे 23 शालेय विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. बेळगावी इथल्या शाळेत गुरुवारी 11 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. या विद्यार्थांवर स्थानिय रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा तपास सुरू आहे. शिक्षण विभागाचे पथक आज, शुक्रवारी या शाळेत पोहचले आहे.
याबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील उल्लागड्डी खानापूर गावातील शाळा संकुलात कन्नड, मराठी आणि उर्दू प्राथमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये सुमारे 400 विद्यार्थी शिक्षण घेतात. याठिकाणी गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दूध देण्यात आले. दुधाची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीला भांड्याच्या तळाशी एक मृत पाल आढळली. याबाबत त्यांनी तातडीने शिक्षकांना सांगितले. ही माहिती मिळताच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दूध प्यायले नव्हते, त्यांना दूध पिण्यास मज्जाव करुन त्यांच्याकडून दूध परत घेण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच हुक्केरी गटशिक्षण अधिकारी (बीईओ) प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली. गट शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,’बेळगावी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व दूध पिणाऱ्या मुलांना संकेश्वर रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे मूळ कारण सांगणे टाळले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
