चेन्नई, 09 जानेवारी (हिं.स.) : तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या (टीएनएसटीसी) कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तामिळनाडू ट्रान्सपोर्ट युनियन आज, मंगळवार 9 जानेवारीपासून बेमुदत संपावर गेली आहे. दरम्यान राज्याचे मंत्री शिवशंकर यांनी हा संप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाने पगारवाढीसाठी 15 व्या वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी करणे, बस चालक आणि वाहक पदावरील रिक्त जागा भरणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) जारी करणे या मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत संप पाळला आहे. परिवहन अधिकाऱ्यांशी सोमवारी बोलणी फिसकटल्यानंतर कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयू), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयूसी) आणि अण्णा थोझीर संगा पेरावई (एटीएसपी) यांच्याशी संबंधित कामगारांनी संपाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे. संपामुळे बसेसच्या चाकांना ब्रेक लागला असून राज्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होतेय.
हिंदुस्थान समाचार
