श्रीहरिकोटा, 06 जानेवारी (हिं.स.) : भारतीय अंतराश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) आदित्य एल-1 हे अंतराळयान आज, शनिवारी दुपारी 4 वाजता एल-1 पॉईंटवर पोहोचणार आहे. ISTRAC च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समधील इस्रोचे वैज्ञानिक आणि अभियंते ही प्रक्रिया पार पडणार आहेत.
इस्त्रोचे अंतराळयान लँगरेन बिंदूच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी सज्ज आहे. हे यान मोहिमेच्या अंतिम टप्यात आले आहे. हे यान शनिवारी 6 जानेवारी रोजी पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या अंतिम कक्षेत ठेवण्यासाठी इस्रोने सर्व तयारी पूर्ण केली आहे. इस्त्रो आदित्य-L1 मोहिमेच्या अंतराळयानाला एल-1 भोवती कक्षेत बांधण्यासाठी महत्वाचा टप्पा पार करणार आहे. या मोहिमेसाठी आजचा दिवस महत्वाचा राहणार आहे. हे यान 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यांन प्रक्षेपित झाल्यावर पृथ्वीभोवती चार फेऱ्या मारून सूर्याच्या लँगरेन बिंदूच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. बेंगळुरूमधील इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क येथून यावर लक्ष ठेवले जात आहे. हे यान पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या एल-1 बिंदूच्या दिशेने गेल्या 110 दिवसांपासून मार्गक्रमण करत आहे.
आदित्य एल1 ही इस्रोची महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आहे. या मोहिमेद्वारे सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. आज या मोहिमेत महत्त्वाचा अंतिम टप्पी पार पडणार आहे. आदित्य-एल-1 मध्ये 7 पेलोड आहेत जे सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थराचे (कोरोना) निरीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. चार पेलोड थेट सूर्याचे निरीक्षण करतील, तर उर्वरित 3 पेलोड एल-1 बिंदूवर कण आणि फील्डचा इन-सीटू अभ्यास करतील. आदित्य-एल-1 मिशन स्पेसक्राफ्ट पाच वर्षांसाठी काम करणार आहे. या काळात यानावरील पेलोड कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, स्पेस वेदर डायनॅमिक्स आदींचा अभ्यास करतील. आदित्य-एल1 हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता, आदित्यला लँगरेन पॉईंट एल-1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणूनच, या मिशनला आदित्य-ए1 असे नाव देण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
