केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची ट्विटरवर माहिती
नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : अयोध्या येथे आगामी 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी प्रभू रामाच्या 3 पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘ट्विटर’वर यासंदर्भात माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आपल्या संदेशात म्हंटले आहे की, अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड निश्चित झाली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे. प्रभू श्रीराम-हनुमानाच्या अतूट नात्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. कर्नाटकातील हनुमानाच्या भूमीतून रामललाची ही सेवा आहे यात शंका नसल्याचे जोशी यांनी नमूद केलेय.अयोध्येत निर्माणाधीन प्रभू श्रीराम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. राम मंदिरात अभिषेक करण्यासाठी 3 मूर्तींपैकी एकाची निवड केली जाणार होती. आता या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अरुण योगीराजांच्या मूर्तीची केवळ निवड करण्यात आली आहे.
श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती देत सांगितलं की, मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. 14 ते 15 जानेवारी या कालावधीत संत आणि ऋषीमुनींच्या हस्ते अभिषेकासह प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख झालेली नाही.
हिंदुस्थान समाचार
