टोकियो, 01 जानेवारी (हिं.स.) : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला आहे. या भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
जपान मेटोलॉजिकल एजन्सीने (जेएमए) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम जपानमधील इशिकावा प्रांतात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. जपानच्या एका माध्यमानं सांगितलं की, निगाटा, टोयामा, यामागाटा, फुकुई आणि ह्योगो प्रीफेक्चरमध्ये जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याशी संबंधित जपानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनामीमुळं समुद्राच्या लाटा 5 मीटर उंचीपर्यंत उसळू शकतात. त्यामुळे लोकांना लवकरात लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या छतावर जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 4:21 वाजता सुनामीचा इशारा देण्यात आलाय. यानंतर तोयामा प्रीफेक्चरमध्ये 4:35 वाजता 80 सेंटीमीटरच्या लाटा किनारपट्टीवर आदळल्या आणि त्यानंतर 4:36 वाजता लाटा निगाता प्रांतात पोहोचल्या. यापूर्वी 28 डिसेंबरलाही जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जपानच्या कुरिल बेटांवर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, अर्ध्या तासात इथं भूकंपाचे 2 धक्के जाणवले होते.
हिंदुस्थान समाचार
