बनारस/उज्जैन, 01 जानेवारी (हिं.स.) : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी होत आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन आणि उत्तरप्रदेशातल्या वाराणसी येथे भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात 2024 ची पहिली भस्म आरती करण्यात आली. त्याचवेळी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर पहिली गंगा आरती आणि सूर्यपूजा करण्यात आली. दोन्ही धार्मिक स्थळी आज, सोमवारी सुमारे 8 लाख भाविक पोहोचण्याची शक्यता आहे. गर्दी पाहता दोन्ही मंदिरांमध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. उज्जैनमध्ये एका दिवसात येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा नवा विक्रम होऊ शकतो. यापूर्वी 2016 मध्ये सिंहस्थाच्या शाही स्नानाच्या पहिल्या दिवशी 6 लाख भाविक आले होते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत भस्म आरतीमध्ये सुमारे 45 हजार भाविकांनी बाबांचे दिव्य दर्शन घेतले. महाकालेश्वराला गरम पाण्याने अभिषेक करण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भस्म आरतीचे ऑनलाइन बुकिंग एक महिना अगोदर पूर्ण झाले होते. तर 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ऑफलाइन बुकिंगसाठी रांग लागली होती, जी तासाभरात पूर्ण झाली.मात्र, मोबाईल दर्शन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कार्तिकेय मंडप रिकामा ठेवण्यात आला होता, तेथून चालित भस्म आरतीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत विक्रमी 11 लाख भाविकांनी महाकालाचे दर्शन घेतले. नवीन वर्षाच्या पहिल्या 2 दिवसांत 12 लाख लोक पोहोचतील असा मंदिर समितीचा दावा आहे.
यासोबतच वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराभोवती भाविकांच्या 2 किमी लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी 30 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ही परिस्थिती कायम होती. लोकांची गर्दी पाहता मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये चारही बाजूंनी प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर ललिता घाट आणि दशाश्वमेध घाटावरून स्नान करताना भाविक रांगेत उभे आहेत. पंतप्रधानांनी 13 डिसेंबर 2021 रोजी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केल्यापासून आतापर्यंत एकूण 13 कोटी शिवभक्तांनी दर्शन घेऊन पूजा केली आहे. कॉरिडॉरचे उद्घाटन झाल्यानंतर भाविकांची गर्दी 10 पटीने वाढली आहे.
हिंदुस्थान समाचार
