सोलापूर 31 डिसेंबर ( हिं.स) आपल्या जिवाला कोणाकडून धोका होऊ नये आणि स्वसंरक्षणासाठी सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांतर्गत चार ते पाच महिलांसह ५१७ जणांकडे शस्त्रपरवाना आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली आहे.
त्यासोबतच गुन्हेगारी घटनाही वाढल्या आहेत. शहरात खून, खुनाचे प्रयत्न केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण स्वसुरक्षेसाठी शस्त्र बाळगत आहेत. जिवाला धोका असल्यास नागरिक शस्त्र बाळगण्याचा परवाना मागू शकतात. त्याची पोलिसांमार्फत खात्री करून प्रशासनाकडून परवाना दिला जातो.तसेच सराव करण्यासाठी खेळाडूंनाही शस्त्र परवाना दिला जातो. मात्र, सोलापूर शहरात शस्त्र परवान्याच्या यादीत एकही खेळाडू नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.बँका, एटीएमच्या सुरक्षेसाठी २० बँकांनी शस्त्र खरेदी केले आहे. १५० सैन्य अधिकाऱ्यांकडे शस्त्रे आहेत. याशिवाय साखर कारखाना, व्यावसायिक यांनीही शस्त्र परवाना घेतला आहे. काही वर्षांत डॉक्टरांवर हल्ले झाल्याने काही डॉक्टरांकडेही शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. जिवाला धोका असल्याने चार ते पाच महिलाही शस्त्र बाळगत आहेत.
हिंदुस्थान समाचार
