पुणे 30 डिसेंबर (हिं.स) गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. बिबवेवाडी व कात्रज परिसरात केलेल्या या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुचाकीसह ५ लाख ८५ हजार ८५० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे.
पुणे विभागाने गुरुवारी बिबवेवाडी येथील शिवतेजनगर या ठिकाणी छापा मारून गोवा राज्य निर्मितीस व विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ९६ सीलबंद जप्त केल्या. आरोपीकडे चौकशी केली असता बिबवेवाडी येथील एका घरात साठा करून ठेवल्याची माहिती दिली. एक्साईज विभागाने त्या ठिकाणी छापा मारून विविध ब्रँडच्या ७५० मिलीच्या ३६ सीलबंद बाटल्या आणि १८० मिलीच्या ४८० सीलबंद बाटल्या (१३ बॉक्स) आढळून आल्या.
हिंदुस्थान समाचार
