रायपूर, 24 डिसेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे रविवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा देखील जप्त केला.
नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमेचा एक भाग म्हणून बस्तर फायटर आणि डीआरजीचे एक संयुक्त दल दंतेवाडातील काटेकल्याण पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प तुमकपाल येथून रवाना झाले होते. या कारवाईदरम्यान, काटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमकापाल आणि डब्बाकुन्ना गावांमधील जंगल टेकडीमध्ये संध्याकाळी 5.30 वाजता पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा आणि सुकमाच्या सीमेवर असलेल्या तुमकपाल आणि डब्बा कुन्ना या जंगलात आणि टेकड्यांमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. चकमकीनंतर दर्भा विभागातील 3 गणवेशधारी पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे आणि इतर नक्षलवादी साहित्य सापडले आहे. दंतेवाडा जिल्हा आणि सुकमा येथील डीआरजी/बस्तर सैनिक आणि सीएएफ आणि सीआरपीएफचे पथक आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.
यासंदर्भात माहिती देताना दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक गौरव राय म्हणाले की, दंतेवाडा-सुकमा सीमा भागातील तुमकापाल आणि डब्बा कुन्ना गावात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षादलाचे जवान याठिकाणी पोहचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळाहून पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आणि नक्षलवाद्यांशी संबंधित साहित्य जप्त केलेय.
हिंदुस्थान समाचार
