नवी दिल्ली, 21 डिसेंबर (हिं.स.) – बौध्द धम्माबद्दल मला आदर आहे. भगवान बुद्धांना संपूर्ण जग आशियाचा ज्ञानसुर्य म्हणून मानते. पुजनीय भिख्खु संघाने दिलेल्या भेटीने मला आनंद झाल्याची नम्र भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातुन अखिल भारतीय भिख्खु संघाच्या बौध्द भिख्खुंनी आज मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी बौध्द भिख्खु संघातील बौध्द भिख्खुंची भेट घडवुन दिली. येत्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत अखिल भारतीय भिख्खु संघाच्या विज्ञान भवन येथे आयोजित कार्यकमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पुज्य भिख्खु संघाने दिले. यावेळी झालेल्या चर्चेत मोदी यांनी पूज्य बौध्द भिख्खु संघ आपल्या भेटीला आल्याबद्दल अत्यंत कृतज्ञपणे त्यांचे आभार मानले.
येत्या फेबु्रवारीमध्ये नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बौध्द भिख्खु संघाच्या सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ते निमंत्रण त्यांनी स्विकारल्याचे आठवले यांनी सांगितले. अखिल भारतीय बौध्द भिक्खू संघाच्या शिष्टमंडळामध्ये पुज्य भदंत करुणानंद महाथेरो, पुज्य भदंत डाँ. राहुलबोधी महाथेरो, पुज्य भिख्खुनंद विवेचन आणि पुज्य भदंत प्रज्ञादिप आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपासक आर के आनंद उपस्थित होते. शिष्टमंडळाने मोदींना संविधान ग्रंथ भेट दिला.
आपण महाकारूणिक तथागत भगवान बुध्दांच्या विचारांवर श्रध्दा ठेवणारे असून मला लहानपणापासुन माझ्या गावातील वडनगर येथील भिख्खु निवासामुळे बौद्ध धम्माची महतीची माहिती असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावात भिख्खु निवास आहे. तेथे चिनी प्रवासी युवान शँग हे येऊन गेले होते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात आणि घरी भगवान बुध्दांची भव्य मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्यांना भगवान बुध्दांच्या धम्माबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल प्रचंड आदर आहे, असे आठवले यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
