सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोटाचे प्रकरण
नागपूर, 17 डिसेंबर (हिं.स.) : नागपुरच्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत घोषणा केलीय.
नागपूरच्या बाजारगाव येथील सत्यनारायण नुवाल यांच्या मालकीच्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये युवराज किशनजी घारोडे, ओमेश्वर किशनलाल मच्छिर्के, मिता प्रमोद उईके, आरती सहारे, श्वेताली दामोदर मारबते, पुष्पा मानपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता, उईके आणि मोसाम पाटले यांचा मृतामध्ये समावेश आहे. मृतामध्ये वर्धा येथील दोन, चंद्रपूर येथील एक आणि अमरावती येथील एक जण आहे. तर 5 जण हे नागपूरचे रहिवासी होते. दरम्यान राज्य सरकारकडून मृताच्या वारसांना 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे.नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
