मुंबई, १३ डिसेंबर, (हिं.स) ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ते सख्खे बंधू होते. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रवींद्र बेर्डे यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. यापूर्वीही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता मात्र ते त्यातून बचावले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, भुताची शाळा, गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक हे चित्रपट गाजले होते. ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
हिंदुस्थान समाचार
