मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.) : टेलिव्हिजनवर अभिनव कॉन्टेन्ट निर्माण करणार््या झी टीव्ही वाहिनीने अलिकेडच ‘कैसे मुझे तुम मिल गये’ ही नवी मालिका प्रसारित करण्यास प्रारंभ केला आहे. मुक्ता धोंड यांची निर्मिती असलेली ही मालिका दररोज रात्री 10 वाजता प्रसारित केली जाते. अमृता आणि विराट या दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तींची ही अशक्यप्राय प्रेमकथा आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे सृती झा आणि अर्जित तनेजा या लोकप्रिय कलाकारांनी साकारल्या आहेत. मुंबईत घडणार््या या मालिकेच्या कथानकात 29 वर्षीय अविवाहित मराठमोळी मुलगी अमृता आणि स्वच्छंदी पंजाबी मुंडा विराट यांची आयुष्ये अनपेक्षितपणे एकमेकांसमोर येतात. अमृताचा प्रेमाच्या ताकदीवर आणि अर्थपूर्ण जीवनसाथीच्या पवित्र सहजीवनावर गाढ विश्वास असतो. तर विराटला आलेल्या वाईट अनुभवामुळे त्याचा लग्नावरचा विश्वास उडालेला असतो आणि सर्व मुली या फक्त पैशाच्या मागे असतात, अशी त्याची समजूत झालेली असते.
प्रत्येक समर्पित कलाकाराप्रमाणे लोकप्रिय अभिनेत्री सृतीसुद्धा आपल्या मराठी मुलीच्या व्यक्तिरेखेचा अभिनय पूर्ण ताकदीनिशी साकारण्यासाठी वचनबद्ध आहे. अमृता चिटणीस ही आपली व्यक्तिरेखा ऑनस्क्रीन उत्तम सादर करण्यासाठी सृती मराठी भाषेच्या बारकाव्यांचा अभ्यास करत आहे. तिला अस्खलित मराठी भाषेत बोलताना पाहून प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्या भूमिकेसाठी तिने स्वतःला अगदी झोकून दिले असून आपली ऑनस्क्रीन आई हेमांगी कविकडून ती मराठी भाषेसाठी मार्गदर्शन मिळवत आहे. हेमांगी ह्या मालिकेत भवानी चिटणीसची भूमिका करत आहे.
सृती झा म्हणाली, “मला मराठी भाषा अगदी व्यवस्थितपणे बोलता येत नसेल पण माझे अनेक महाराष्ट्रीय दोस्त आहेत, जसे की मुग्धा, जी अर्थातच मराठीमध्ये अगदी अस्खलितपणे बोलू शकते. मी त्यांच्याकडून ही भाषा थोडीफार शिकले आहे. त्यामुळे माझ्याशी कोणी मराठीत बोलत असेल तर मी समजू शकते पण जर मला विषय माहिती नसेल तर ते समजण्यासाठी थोडे कठीण जाते. मला हेमांगीची खूप मदत होते कारण निर्मात्यांनी यात काही मुंबईचा अस्सलपणा टिपण्यासाठी मराठी शब्द आणि वाक्ये पटकथेमध्ये वापरली आहेत. आमची अनेक दृश्ये एकत्र आहे आणि हेमांगी मला नेहमीच मौल्यवान मार्गदर्शन करते. हेमांगीने मला काही वाक्येही शिकवली आहेत, जी मी ह्या शोमध्ये विराटसाठी वापरेन.”
हिंदुस्थान समाचार
