नाशिक, ६ डिसेंबर (हिं.स.) : नाशिकची ओळख बनलेल्या १० व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंटकडून करण्यात येत आहे. येत्या दिनांक ८ ते १० डिसेंबर २०२३ या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे रोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. हा फेस्टिवल सर्वासाठी खुला असून यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. फेस्टिव्हलचे उद्घाटन दिनांक ८ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता प्रसिद्ध माहितीपट निर्माते राहुल रॉय, नवी दिल्ली यांच्या द फॅक्टरी या माहितीपटाच्या सादरीकरणाने होणार आहे. यावेळी राहुल रॉय यांची उपस्थिती देखील लाभणार आहे. तर फेस्टीव्हलचा समारोप १० डिसेंबरला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पद्मश्री सुधारक ओळवे माहितीपट छायाचित्रकार, मुंबई आणि निर्माण चौधरी फिल्म निर्माते, मुंबई हे कॅमेरा तंत्र आणि दृश्य कथन करणारे बदलाचे शिल्पकार या विषयावर प्रात्यक्षिक घेणार आहेत. फेस्टिव्हलमध्ये ५० हून अधिक फिल्मस्, माहितीपट, या कलाकृतीचे सादरीकरण होणार असून वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा देखील संपन्न होणार आहेत.
या फेस्टिवलमध्ये नवोदित कलाकारांना, वंचित समूहांतील घटकांना आपले जगणे मांडण्यासाठी असलेले व्यासपीठ म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यामध्ये फक्त फिल्म्सचे सादरीकरणच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून शिकून आपली अभिव्यक्ति आणखी समृद्ध करण्यासाठीची संधी म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यात कुठलीही स्पर्धा नाही, पारितोषिक नाही, अंतिम कलाकृतीपेक्षा कलाकृती लोकांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. तरी नाशिककरांनी आवर्जून अंकुर फेस्टीव्हलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अभिव्यक्तीकडून करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
