जयपूर, 05 डिसेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर आज, मंगळवारी जयपूरमध्ये गोळीबार करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झालाय.
यासंदर्भातील माहितीनुसार सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या श्यामनगरातील घरामध्ये घुसून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सुखदेव सिंह यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासनामध्ये खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांबरोबरच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर मेट्रो मास रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुखदेव सिंह यांना दोन गोळ्या मारण्यात आल्या आहेत. मात्र हा गोळीबार कुणी केला, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
सुखदेव सिंह गोगामेडी दीर्घकाळापासून राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित होते. त्यांनी करणी सेनेच्या संघटनेत झालेल्या वादानंतर राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. गोगामेडी हे तिचे अध्यक्ष आहेत. ते पद्मावत चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काऊंटर केसनंतर राजस्थानात झालेल्या आंदोलनामुळे चर्चेत आले होते. याबाबतचे त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.
हिंदुस्थान समाचार
