डोंबिवली, ०१ डिसेंबर (हिं.स.) : ज्वेलर्सच्या दुकानात भिंतीला भगदाड पाडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी न झाल्याने चोरट्यांनी दुकानातील चांदी आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६ लाखाचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यांनी आपला चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी ज्वेलर्स मधील सीसीटीव्ही कॅमेरातील डिव्हीआर ही चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिमकडील महात्मा फुले रोडवर रत्नसागर ज्वेलर्सचे दुकान आहे. चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकानात चोरण्यासाठी बाजूकडील गाळा भाड्याने घेतला होता. चोरटे हे झारखंड येथील राहणारे होते. त्यांनी मोमोज तयार करण्याचा बोर्ड लावला होता. २८ तारखेला रात्री चोरट्यांनी गाळ्यात जाऊन शटर बंद करून बाजूकडील ज्वेलर्सच्या दुकानाची भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कट करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. चोरट्यांनी दुकानातील ११० किलो चांदी आणि काही प्रमाणात सोन्याचे दागिने चोरून पळ काढला.
हिंदुस्थान समाचार
