हैदराबाद, 30 नोव्हेंबर (हिं.स.) : तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज, गुरुवारी मतदान झाले. यात दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 51.89 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. राज्यात सकाळी 7 वाजता मतदानाला संथ सुरुवात झाली. त्यामुळे 1 वाजेपर्यंत तेलंगणामध्ये 36.68 टक्के मतदान होऊ शकले.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 2,290 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री केसीआर, त्यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजप लोकसभा सदस्य बी संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात 35 हजार 655 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून तेथे एकूण 3.26 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. राज्यातील 106 मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत आणि उर्वरित 13 मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 यादरम्यान मतदान निश्चित करण्यात आले होते. राज्याच्या काही भागात मतदानादरम्यान
गोंधळ निर्माण झाला होता. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून बीआरएस उमेदवारांविरोधात निवडणूक प्रक्रियेच्या उल्लंघनाची तक्रार केली आहे. किशन रेड्डी यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
हिंदुस्थान समाचार
