नाशिक, २९ नोव्हेंबर, (हिं.स) : चालत्या रेल्वेत प्रवाशांशी बसण्याच्या जागेवरून वाद घालून त्याच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केलेल्या चार संशयितांना लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत मालेगाव येथून ताब्यात घेतले.
याबाबत लोहमार्ग पोलिसांनी सांगितले की, महफूज रईस आलम (वय३४, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) हा तरूण मंगला एक्सप्रेसने आग्रा ते कल्याण असा प्रवास करत होता. त्यावेळी मनमाड येथून बसलेल्या चार युवकांनी मनमाड ते नाशिकरोड दरम्यान महफूज आलम या तरुणाशी बसण्याच्या जागेवरून वाद घातला. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावू लागले. त्याला विरोध केला असता चौघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. याबाबत त्याने नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली.सीसीटीव्ही व गुप्त बातमीदाराच्या मदतीने लोहमार्ग पोलिसांनी पवन सुरेश चव्हाण, राकेश प्रशांत मगरे, शुभम महेश देवरे व सचिन मिलिंद अहिरे (सर्व राहणार मालेगाव) यांना मालेगाव येथून काही तासांत शिताफीने ताब्यात घेतले. प्रभारी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, विजय कपिले, शैलेश पाटील, आरपीएफचे मनीष कुमार, दीपक सानप आदींनी कामगिरी केली. लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अधिकारी मारुती पंडित यांनी पथकाचे कौतुक केले.
हिंदुस्थान समाचार
