सोलापूर , 23 नोव्हेंबर (हिं.स.) कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवारी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडला. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती आहे.
श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेतही लाखो भाविक उभे असल्याचे दिसून आले. ही दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यापर्यंत गेली होती. दरम्यान, पहाटे साडेतीनच्या सुमारास शासकीय महापूजा पार पडली. फडणवीस दाम्पत्यासोबतच मंत्रिमंडळातील काही मंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनातील अधिकारीही उपस्थित राहणार होते. मंदिर समितीने संपूर्ण सोहळ्याचे चोख नियोजन केल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
कायदा-सुव्यवस्था, गर्दीवरील नियंत्रण मिळविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. याशिवाय वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. पंढरपूर शहरात येणारी जड वाहतूक बंद केली असून या जड वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार
